नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अमेरिकेसारखे अनेक प्रगत देश कोरोनापुढे (CoronaVirus) हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील सातत्याने वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर दोन लाख लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (11 मे) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 3,29,942 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,876 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,29,92,517 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,15,221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,90,27,304 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. रुग्णांची आणि मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान एक धक्कादाक माहिती समोर आली आहे. 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे असलेल्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये गेल्या 20 दिवसांमध्ये 26 प्राध्यापकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याने विद्यापीठात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू तारीक मनसुर यांच्या भावाचाही गेल्या आठवड्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तारीक यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआरला) लिहिलेल्या पत्रामध्ये विद्यापीठातील कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या चाचण्या करुन येथील व्यक्तींना संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास करुन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल संशोधन करावं अशी मागणी केली आहे.
परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला
कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने सात कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन मिळण्यास उशीर झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील सात रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला.