नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा सर्वच देशांत उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 19 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका पुन्हा एकदा वाढत आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 39,742 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी (25 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 39,742 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 535 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,20,551 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,08,212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,05,43,138 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने (Delta Variant) थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. डब्ल्यूएचओ साथीच्या आजाराबाबत दर आठवड्याला देत असलेल्या माहितीमध्ये डेल्टा व्हायरसच्या संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याचा विविध देशांचा प्रयत्न असला तरी विविध देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद इंडोनेशियामध्ये झाली असून 3,50,273 नवे रुग्ण आहेत. ब्रिटनमध्ये 2,96,447 नवे रुग्ण, ब्राझीलमध्ये 2,87,610 नवे रुग्ण, भारतामध्ये 2,68,843 नवे रुग्ण, अमेरिकेमध्ये 2,16,433 नवे रुग्ण आढळून आले.
20 जुलैपर्यंत कोरोनाचे 24 लाख नमुने जिनोमिक माहितीसाठी पाठविण्यात आले. त्यातील दोन लाख 20 हजारांहून अधिक नमुने डेल्टा प्रकाराचे असल्याचे दिसले. डेल्टामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन, डेन्मार्क, भारत, इंडोनेशिया, इस्राईल, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन या देशांमध्ये ‘डेल्टा’चा प्रभाव 75 टक्क्यांहून अधिक असल्याचं दिसलं आहे. डेल्टामुळे कोरोनाच्या इतर प्रकारांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून येत्या काळात डेल्टाचाच प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. जगभरात अल्फा प्रकारचे विषाणू 180 देशांत, बीटा प्रकारचे विषाणू 130 देशांत, गॅमा प्रकारचे 78 देशांत, तर डेल्टा प्रकारचे 124 देशांत रुग्ण नोंदविले गेले आहेत.