CoronaVirus Live Updates : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 9 महिन्यांनी नव्या रुग्णांच्या संख्येत झाली मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 11:30 AM2021-11-16T11:30:54+5:302021-11-16T11:42:29+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे.
नवी दिल्ली - कोरोनाने अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने 25 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 254,589,978 वर पोहोचली आहे. तर 5,122,004 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील 230,190,379 जण कोरोनातून बरे झाले आहेत. याच दरम्यान भारतातही कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. तब्बल 9 महिन्यांनी नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 8,865 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (16 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,30,793 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
#COVID19 | India reports 8,865 new cases (lowest in 287 days), 11,971 recoveries & 197 deaths in last 24 hrs.
— ANI (@ANI) November 16, 2021
Active caseload 1,30,793 - lowest in 525 days. Daily positivity rate (0.80%) less than 2% for last 43 days, Weekly Positivity Rate (0.97%) less than 2% for last 53 days. pic.twitter.com/sRqxzpVCXM
कोरोनाचा धसका! लसीकरण नाही तर स्वातंत्र्य नाही; 'या' देशात लस न घेणाऱ्यांसाठी लॉकडाऊन
संपूर्ण जगालाच कोरोनाने विळखा घातला आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वच देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. युरोपमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. युरोपच्या काही भागातील परिस्थिती ही चिंताजनक आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. मात्र तरी देखील वेगाने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे प्रशासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युरोपच्या ऑस्ट्रियामध्ये लस न घेणाऱ्यांविरोधात एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. सरकारने अशा लोकांसाठी लॉकडाऊन लावला आहे. ज्या लोकांनी ऑस्ट्रियामध्ये कोरोनाची लस घेतली आहे. त्यांना सुविधा देण्यात येत आहेत.
लसीकरण झालेल्या लोकांनी रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये जाता येत असून तिथे सुविधा देण्यात येत आहेत. मात्र ज्य़ा लोकांनी कोरोना लस घेतलेली नाही त्यांना घरामध्येच राहावं लागणार आहे. त्यांना फक्त जीवनावश्यक वस्तू आणण्याची आणि डॉक्टरांकडे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या लोकांना आता कोरोनाची लागण झाली आहे आणि अजूनही ते बरे झालेले नाहीत अशांना देखील लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार आहे. ऑस्ट्रियाचे चान्सलर एलेझेंडर शालेनबर्ग यांनी या कठोर नियमांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रियामध्ये सीमित लोकांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच लसीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग चांगला असून आतापर्यंत 65 टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.