नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,62,63,695 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,32,730 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 2,263 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,86,920 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशातील अनेक रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन अभावी काही ठिकाणी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्या 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर 60 रुग्णांचा जीव धोक्यात असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गेल्या 24 तासांत 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 60 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचा जीव सध्या धोक्यात आहे. याच दरम्यान रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुडवडा निर्माण झाला असून फक्त दोन तास पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. रुग्णलयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपलब्ध असलेला ऑक्सिजन फक्त दोन तास पुरेल. तसेच व्हेंटिलेटर आणि बीआयपीएपी मशीन नीट काम करत नाही. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
भयंकर! भयावह!! फक्त 3 दिवसांत तब्बल 1057 मृतदेहांवर अंत्यसंस्कार; दिल्लीत परिस्थिती गंभीर
दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दिल्लीच्या तीन महानगरपालिकांने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत तब्बल 1,057 लोकांचे अंत्यसंस्कार (Corona Death In Delhi) करण्यात आले असून हे अत्यंत भयानक आहे. तीन महानगरपालिकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीत 18 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान दररोज अंदाजे 352 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन महानगरपालिकांच्या 9 क्षेत्रांत 21 स्मशानभूमी आणि कब्रस्तान आहेत. नगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, 18 एप्रिल रोजी 290 अंत्यसंस्कार (372 अंत्यसंस्कार आणि 17 दफन), 19 एप्रिल रोजी 357 अंत्यसंस्कार (334 अंत्यसंस्कार आणि 23 दफन) आणि 20 एप्रिल रोजी 410 अंतिम संस्कार (391 अंत्यसंस्कार आणि 19 दफन) केले गेले आहे.
देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान एका मुलीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र याच वेळी ऑक्सिजन पुरवठा नसल्याने वडिलांच्या काळजीने लेकीच्या जीवाची घालमेल होत आहे.
"रुग्णालयात ऑक्सिजन नाही, माझ्या बाबांचं काय होणार?" असं म्हणत मुलीने ऑक्सिजनसाठी मदत मागितली आहे. तर अशा अनेक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांनाच ऑक्सिजन नसल्याने काही समस्यांचा सामना करावा लागला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट केलं आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.