मल्लापूरम - कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल एक लाख 90 हजारांच्यावर गेला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. इयत्ता नवव्या शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहता येत नसल्याने ही मुलगी अत्यंत निराश झाल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. त्यामुळेच तिने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
विद्यार्थिनीचे वडील रोजंदारीवर काम करतात. लॉकडाऊनमुळे सध्या अत्यंत अल्प उत्पन्नावर घर चालवावे लागत आहे. 'घरामध्ये टीव्ही आहे. पण तो बंद आहे. टीव्ही दुरुस्त करण्याची गरज आहे असे तिने मला सांगितले होते. पण मी तो दुरुस्त करू शकलो नाही. तिने टोकाचे पाऊल का उचलले ते समजत नाही. मैत्रिणीच्या घरी जाऊ शकतेस असा पर्याय मी तिला सुचवला होता' अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपण पुढे शिक्षण घेऊ शकणार नाही किंवा आपल्या शिक्षणावर परिणाम होईल याची मुलीला चिंता सतावत होती. केरळचे शिक्षण मंत्री सी. रवींद्रनाथ यांनी या दुर्देवी घटनेबद्दल जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. कोरोनाच्या संकटात केरळ सरकारने एक जूनपासून ऑनलाईन शिक्षणवर्ग सुरू केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?
'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल
CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त