Coronavirus, LockdownNews: गुगल सर्च वाढले; किराणा...प्रतिकार शक्ती...गादी...यांची शोधाशोध!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 11:43 PM2020-05-02T23:43:43+5:302020-05-02T23:44:05+5:30
विमा संरक्षण, घरगुती जीम-व्यायाम प्रकाराचा शोधही वाढला
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने नागरिकांचा विविध गोष्टींचा आॅनलाईन शोध वाढला आहे. ऑनलाईन बाजारातही घराजवळील किराणा आणि रास्त धान्य दुकानांची माहिती विचारणारांची गर्दी उसळली आहे. प्रतिकार शक्ती वाढविणारी औषधांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. खूप काळ घरी राहिल्याने गादीचे महत्त्व देखील अनेकांना जाणवू लागले आहे. चांगली गादी कोणती याचा ऑनलाईन शोध घेतला जात आहे.
गेल्या चाळीस दिवसांहून अधिक काळ देश लॉकडाऊनचा सामना करीत आहे. त्यात आणखी १४ दिवसांची (१७ मे पर्यंत) वाढ करण्यात आली आहे. अनेकजण सध्या मोबाईलवरील इंटरनेटवर व्यस्त असल्याचे दिसतात. लॉकडाऊनमुळे किराणा दुकानांच्या वेळाही मर्यादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज किराणा दुकाने सुरु असूनही, तेथे विविध ठिकाणी गर्दी उसळताना दिसते. तोच प्रकार ऑनलाईन सर्चमधेही दिसून येत आहे. आपल्या घराजवळील किराणा दुकान कोठे आहे, याची मॅपसह विचारणा केली जात आहे. त्याचे प्रमाण तब्बल साडेपाचशे टक्क्यांनी वाढले आहे. रेशन दुकानांच्या शोधातही तीनशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. औषधांची दुकान शोधण्याचे प्रमाण ५८ टक्क्यांनी वाढले आहे.
प्रतिकार शक्ती वाढविण्याची आयुर्वेदिक आणि इतर औषधे शोधणाऱ्यांच्या संख्येतही तब्बल पाचशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्हिटॅमीन सी हा घटक कोणत्या पदार्थात अधिक आहे, याचा शेध वाढला आहे. व्हिटॅमीस सी सर्च करण्यात २०१९मधे ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. गेल्या काही आठवड्यात त्यात दीडशे टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रतिकारशक्ती वाढविणाºया आयुर्वेदिक काढ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर शोध घेतला जात असून, त्यात गिलोयचे प्रमाण सर्वाधिक आहे.
घरी बसल्यामुळे चांगल्या गादीचे महत्त्व एकदम वाढल्याचे दिसून येते. चांगली गादी कोणती याचा सर्च दीडशे टक्क्यांनी वाढला आहे. त्याच जोडीला हेडसेटचा शोध १४० टक्क्यांनी, चांगला सिनेमा कोणता याच्या शोधात ३५ आणि अलिकडचा इंटरनेटवरील ट्रेंड (कल) कोणता आहे, हे जाणून घेणाऱ्यांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरच्या घरी जीम शोधणाºयांच्या प्रमाणातही ९३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाच मिनिटात खाद्यान्न तयार करा, आॅनलाईन शिकवण्या आणि घरच्या घरी शिका या विभागात ५० ते ८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंची खरेदी सख्या थांबली आहे. ऑनलाईन विजेचे बिल भरण्याचे प्रमाण १८० टक्क्यांनी वाढले आहे. फ्री व्हिडिओ डेटींग साईटचा शोधही ७० टक्क्यांनी वाढल्याचे गुगल सर्च वरुन दिसून येत आहे.
का वाढलाय गिलोय सर्च?
गिलोय हे एका वेलीचे पान आहे. आंबा, कडुनिंबासह विविध झाडांचा आधार घेऊन ही वेल वाढते. खाण्याच्या पानासारखा तिचा आकार असतो. आयुर्वेदिक औषधांमधे या पानाला महत्त्व आहे. या पानाला इंग्रजीमधे टीनोस्पोरा कार्डिफोलिया म्हणतात. ज्वरनाशाक, मधुमेह, पचनाचे विकार, प्रतिकारशक्ती वाढविणे, सर्दी-खोकला या मधे पानाचा वापर होतो. ‘कोविड-१९’ची लक्षणे हीच असल्याने या पानाबाबत लोकांची उत्सुकता वाढली आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय याचे सेवन न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
गुंतवणूक सल्लेही हवेत
कोरोनामुळे शेअरबाजार कोसळला आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबतही लोकांमधे उत्सुकता आहे. म्युच्युअल फंडामधे आत्ता गुंतवणूक करणे योग्य आहे का? असे जाणून घेणाºयांच्या संख्येत अडीचशे टक्क्यांनी वाढ झाली असून, म्युच्युअल फंडाबाबत इतर माहिती विचारणारांची संख्या ४११ टक्क्यांनी वाढली आहे.