नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारनं दोन आठवड्यांनी वाढवला आहे. त्यामुळे १७ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहील. या कालावधीत ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही सवलती देण्यात येतील. याबद्दलची नियमावली गृह मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कोरोना विषाणूबद्दलची माहिती देणाऱ्या आरोग्य सेतू अॅपबद्दल महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हे अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक असेल. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसोबतच कंटेनमेंट झोनमध्ये वास्तव्यास असलेल्या सगळ्या रहिवाशांनादेखील आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावं लागेल. याकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष द्यावं, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे अॅप डाऊनलोड करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. झोमॅटोनंदेखील खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जातं. आपण कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत का, याची माहिती ब्लूटूथच्या माध्यमातून अॅप वापरणाऱ्या व्यक्तीला मिळते. कोरोनाबाधित व्यक्ती किती दूर आहे, याची माहिती यावर मिळते. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती फार दूर असेल तर ग्रीन अलर्ट मिळतो. ती व्यक्ती मध्यम अंतरावर असल्यास ऑरेंज आणि अतिशय जवळ असल्यास रेड अलर्ट मिळतो. गृह मंत्रालयानं लग्न, अंत्य संस्कारासाठीदेखील नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यानुसार लग्न करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागेल. लग्नाला ५० पेक्षा अधिक जणांना उपस्थित राहता येणार नाही. तर अंत्यसंस्कारावेळी २० पेक्षा अधिक जणांना हजर राहता येणार नाही.
CoronaVirus News: 'या' व्यक्तींना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावंच लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 9:26 AM