CoronaVaccine: कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला सुरुवात, मंत्री अनिल विज यांनी टोचून घेतली पहिली लस
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 20, 2020 02:31 PM2020-11-20T14:31:49+5:302020-11-20T14:37:19+5:30
आपण कोव्हॅक्सीन परीक्षणातील व्हॉलंटिअर म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीत सर्व प्रथम लस टोचून घेऊ, असे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी यापूर्वीच जाहीर केले होते
चंदीगड - हरियाणाचे गृह तसेच आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोव्हॅक्सीन परीक्षणात व्हॉलंटिअर म्हणून स्वतः लस टोचून घेतली आहे. भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने तयार केलेल्या कोरोना व्हायरस महामारीवरील कोव्हॅक्सीन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणाला आजपासून हरियाणात सुरुवात झाली.
आपण कोव्हॅक्सीन परीक्षणातील व्हॉलंटिअर म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीत सर्व प्रथम लस टोचून घेऊ, असे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी यापूर्वीच जाहीर केले होते
लसीचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षण पूर्ण -
या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षण आणि विश्लेषण यशस्वी ठरले असून आता तिसऱ्या टप्प्यावरील टप्प्यावरील परीक्षण सुरू करण्यात आले आहे. मानवी चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जवळपास एक हजार व्हॉलंटिअर्सना ही लस देण्यात आली होती. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणी भारतातील एकूण 25 केंद्रांवर 26,000 लोकांवर करण्यात येणार आहे. कोरोना लशीसाठी भारतात आयोजित करण्यात आलेली ही सर्वात मोठी मानवी क्लिनिकल ट्रायल आहे.
Haryana Health Minister Anil Vij being administered a trial dose of #Covaxin, at a hospital in Ambala.
— ANI (@ANI) November 20, 2020
He had offered to be the first volunteer for the third phase trial of Covaxin, which started in the state today. pic.twitter.com/XDLy6et5uM
परीक्षण काळात व्हॉलंटिअर्सना साधारणपणे 28 दिवसांच्या आत दोन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले जातील. या परीक्षणात भाग घेणाऱ्या इच्छुक स्वयंसेवकांचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. ही मल्टिसेंटर थर्ड फेस ट्रायल भारतात एकूण 22 ठिकाणी होईल.
संपूर्ण जगाचे लक्ष लशीकडे -
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हैराण आहे. सर्वच देशांनी कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष कोरोनावरील लशीकडे लागले आहे. कोरोनावरील लस तयार करण्याच्या शर्यतीत भारतही आहे. सर्वच भारतीयांच्या आशा, आता भारतीय कोरोना लस कोव्हॅक्सीनवर आहेत.
देशभरात लस पोहोचविण्यासाठी विमानतळांवर तयारी सुरू -
कोरोनाला मात देणाऱ्या लशीच्या उपलब्धतेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी संपूर्ण भारतात लस पोहचविण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय हवाईवाहतूक आणि विमानतळ व्यवस्थापनेने याबाबतचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लशीचे कोट्यवधी डोस संपूर्ण देशात पोहोचविण्यासाठी 'कोल्ड चेन स्टोरेज' व्यवस्था निर्माण केली जात आहे. विमानतळांवर कार्गो यूनिट्स तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएमआर ग्रूपने दोन्ही ठिकाणी 'कुलिंग चेंबर्स' उभारले आहेत. याशिवाय इतर काही विमानतळांवर आणि हवाई वाहतूक कंपन्यांनी लशीच्या वाहतूकीची तयारी सुरु केली आहे.