नवी दिल्ली - देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे . नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असंही मोदी म्हणाले. कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 49,000 हून अधिक झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, टेस्टच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदी सरकार कशापद्धतीने काम करत आहे याबाबत अनेक एजन्सी सर्व्हे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कोरोना सक्षमपणे लढण्यास समर्थ असल्याची माहिती एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे. शहरी भागातील 87 टक्के भारतीय मोदी सरकारच्या कोरोनासंदर्भातील कामावर समाधानी असल्याचं म्हणत आहेत. इप्सॉस या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामधून ही आकडेवारी समोर आली आहे.
इप्सॉसने केलेल्या सर्व्हेनुसार, शहरी भागातील 87 टक्के लोकांनी कोरानाशी सामना करणाऱ्या मोद सरकारला हाय रेटींग दिलं आहे. कंपनीने 23 ते 26 एप्रिलदरम्यान जगभरातील 13 देशांमध्ये 26 हजार लोकांची याबाबत मते जाणून घेतली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही हे या लोकांना विचारण्यात आलं. यामध्ये 13 पैकी 9 देशांमधील बहुतांश नागरिकांनी त्यांच्या देशातील सरकार हे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलत असल्याचं मत नोंदवलं आहे.
इप्सॉस इंडियाचे सीईओ अमित अडारकर यांनी भारत सरकारबाबत मत व्यक्त केलं आहे. 'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तातडीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. तसेच इतरही अनेक महत्वाचे प्रतिबंधात्मक निर्णय सरकारने तातडीने घेतले. आता सरकारकडून ग्रीन झोनमध्ये काळजीपूर्वपणे कारभार आणि उद्योगधंदे सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेतले जात आहेत. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश लोकांनी सरकार ज्या पद्धतीने कोरोनाचा सामना करत आहे त्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे' असं अडारकर यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये शहरी भागातील 75 टक्के नागरिकांनी जागतिक आरोग्य संघटना चांगलं काम करत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'आरोग्य सेतू मित्र' वेबसाईट लाँच; घरबसल्या मिळणार वैद्यकीय सुविधा
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अडकलेले तब्बल 80 हजार लोक 70 विशेष ट्रेनने परतले घरी
CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड