हुबळी : केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. कर्नाटकात सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दारूची दुकाने उघडली जाणार आहेत. दरम्यान, दारूची दुकाने उघडणार असल्याने मद्यप्रेमींनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कर्नाटकातील हुबळीमध्ये एका दारूच्या दुकानाबाहेर सकाळी सात वाजताच लोकांनी रांगा लावल्या होत्या.
लॉकडाऊन-3 मध्ये केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, प्रत्येक जण मास्क लावून किंवा चेहरा झाकून दारू खरेदी साठी येईल. दरम्यान, काही ठिकाणी दारूच्या दुकानासमोर सोशल डिस्टंसिंगसाठी आखण्यात आलेल्या सर्कलवर लोक उभे असल्याचे दिसून येत आहे.
याचबरोबर, अनेक दारूच्या दुकानांबाहेर पोलीस सुद्धा तैनात आहेत. गर्दीमुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू नये, यासाठी दारूच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टंसिंगचे पालन लोकांकडून होत आहे की, नाही यावर पोलीस नजर ठेवून आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत. मात्र, रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. याचबरोबर, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्यातील सरकाराने आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे.