नवी दिल्ली - लॉकडाऊननंतर लागू केलेल्या अनेक निर्बंधांमुळे देशात सध्या मास्क आणि सॅनिटायझर हे परवलीचे शब्द बनले आहेत. सध्या कुणीही मास्कविना फिरताना दिसत नाही. या दोन्ही गोष्टींना प्रचंड मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात येताच मास्क आणि हँड सॅनिटायझरला सरकारने ‘जीवनावश्यक वस्तू’ घोषित केले होते. आता सरकारने या दोन्ही वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याचे समजते.जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे सरकारला निवडलेल्या वस्तूंची किंमत निश्चित करता येते, तसेच यांची साठेबाजी करता येत नाही. मास्क, सॅनिटायझर यांना जीवनावश्यक वस्तंूच्या यादीत समाविष्ट करणाऱ्या अधिसूचनेची मुदत ३० जूनपर्यंतच होती. ही मुदत आणखी वाढविण्यास सरकार तयार नाही. एका सरकारी अधिका-याने सांगितले की, देशात या दोन्ही वस्तू सध्या मुबलक प्रमाणात आहेत. तसेच या वस्तूंची निर्यातही होत असल्याने सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून या वस्तूंना वगळण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)किमती वाढण्याची भीतीसामान्य नागरिक मात्र सरकारच्या या निर्णयामुळे खूश नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याने आता यांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या जाण्याची भीती आहे. असे झाल्यास ज्यांना शक्य आहे ते या वस्तू मोठ्या प्रमाणात घेऊन ठेवतील आणि यांची खरी गरज असलेला वर्ग यापासून वंचित राहील, असे लोकांना वाटत आहे.
coronavirus: ‘जीवनाश्यक वस्तूं’च्या यादीतून मास्क, सॅनिटायझरला वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 4:11 AM