कोरोना संकटापासून सुटका मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनावर लस शोधण्याचे प्रयोग सर्वच देश करत आहेत. अजूनतरी कोणाच्याही हाती यश आले नाही. त्यामुळे संपूर्ण जग कोरोनाच्या तावडीतून अजूनतरी सुटलेले नाही. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा वाढता आकडा पाहून अनेकांना धडकी भरली आहे. त्यात बरे होणा-या रुग्णांची संख्याही अधिक आहे. ही एक भारतासाठी दिलासादायक बातमी असतली तरी पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य म्हणजे देशभरातील एकूण रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण हे एकट्या मुंबई शहरात आहेत.त्यामुळे येणारा काळ हा मुंबईकरांसाठी चिंतेचा ठरू शकतो.
मिशिगन युनिव्हर्सिटी ऑफ बायोस्टॅटिस्टिक्सचे आणि रोग तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी एजन्सी रॉयटर्सला याबाबत सांगितले की, भारतातील परिस्थिती येत्या काळात आणखी गंभीर होऊ शकते, अशी माहिती तयार केलेल्या मॉडेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.भारतात अद्याप संसर्गाचे प्रमाण कमी झालेले नाही, सरकारी आकडेवारीनुसार भारतात कोरोनाची प्रकरणं 13 दिवसांनी दुप्पट होत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये शिथिल करण्यात आलेले नियम अडचण वाढवू शकतात. २१ जुलैपर्यंत भारतात कोरोनाचा धोका वाढू शकतो असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रत्येकाने स्वत-ची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
चिंतेची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या आकड्यात आता भारतानं इराणला मागे टाकले आहे. मिशिगन युनिव्हर्सिटी आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सर्व्हेक्षणानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात 21 लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या अडचणी वाढू शकतात. तर, लॉकडाऊनचे नियम आणखी कडक करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.