coronavirus : गावाने ज्या शाळेत आसरा दिला, मजुरांनी कौशल्य दाखवत तिचा चेहरामोहरा बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 04:03 PM2020-04-22T16:03:12+5:302020-04-22T16:12:11+5:30
गावाकडे पलायन करणाऱ्या मजुरांनी क्वारेंटाईन काळात केले कौतुकास्पद काम
जयपूर - कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. या लॉकडाऊनदरम्यान सर्व आर्थिक व्यवहार बंद झाल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात फरफट झाली. तसेच रोजगार गेल्याने गावची वाट धरणाऱ्या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यातील अनेक मजुरांना विविध ठिकाणी क्वारेंटाईन करण्यात आले. अशाच एका ठिकाणी ठेवण्यात आलेल्या मजुरांना गावकऱ्यांनी आधार दिला. त्यानंतर या मजुरांनी गावकऱ्यांनी केलेल्या मदतीची नेहमी लक्षात राहील अशी परतफेड केली. अडचणीत असलेल्या या गरिबांनी दिलेली भेट पाहून गावकऱ्यांचेही मन भरून आले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, राजस्थानमधील सीकर येथील पलसाना येथे एका शाळेत गावाकडे पलायन करणाऱ्या काही मजुरांना आयसोलेट करण्यात आले होते. यामध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील 54 मजुरांचा समावेश होता. या मजुरांची गावचे सरपंच आणि गावातील दानशूर चांगली व्यवस्था केली. दरम्यान, गावकऱ्यांनी केलेली मदत पाहून भारावलेल्या या मजुरांनी गावासाठी काहीतरी करण्याचा विचार बोलून दाखवला. तसेच त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेची रंगरंगोटी करण्याची तयारी दाखवली.
त्यानंतर या मजुरांना गावकऱ्यांनी रंगरंगोटीचे सामान उपलब्ध करून दिले. त्यानंतर या मजुरांनी आपले कौशल्य दाखवत शाळेचे रंगरूप बदलून टाकले. दरम्यान, येथील आयसोलेशन केंद्राची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाचे सचिव जगत सिंग पंवार यांनी या कामाचे कौतुक केले.
पलसाना गावचे सरपंच रूपसिंह शेखावत यांनीही या मजुरांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. या शाळेत गेल्या नऊ वर्षांपासून रंगरंगोटी झाली नव्हती. त्यामुळे सर्व शिक्षकांनी शाळेच्या रंगरंगोटी स्वखर्चाने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आवश्यक सामुग्री आणून दिली. मात्र या मजुरांनी कामाचे पैसे घेण्यास नकार दिला, असे या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र मीणा यांनी सांगितले.