Coronavirus: कोरोनावर नवा उपचार, जीन सायलेन्सिंग तंत्र उंदरांवर यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 06:54 AM2021-05-26T06:54:53+5:302021-05-26T06:55:11+5:30
Coronavirus News: कोरोनाविरोधात विविध लसी बाजारात आल्या असल्या, तरी आणखी काय उपाय करता येतील, यावर संशोधन सुरू आहे. जीन सायलेन्सिंग हे तंत्र त्यातलेच एक...
कोरोनाची बला एकदाची टळावी, यासाठी सर्व जग झटून प्रयत्न करत आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या आजारापासून सुटका करून घेण्यासाठी संशोधनात गुंतला आहे. विविध लसी बाजारात आल्या असल्या, तरी आणखी काय उपाय करता येतील, यावर संशोधन सुरू आहे. जीन सायलेन्सिंग हे तंत्र त्यातलेच एक...
कोणी केले संशोधन
- ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी शास्त्रज्ञांनी कोरोनावरील उपचारांसाठी एकत्रित प्रयत्न केले.
- ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडस्थित ग्रिफिथ विद्यापीठाच्या मेंडीस हेल्थ इन्स्टिट्यूट आणि सिटी ऑफ होप अँड रिसर्च सेंटर यांनी क्रांतिकारी संशोधन केले आहे.
- रिसर्च टीमचे प्रमुख नायजेल मॅकमिलन यांनी आरएनए तंत्राच्या साह्याने शरीरातील ९९.९ टक्के विषाणूंचे समूळ उच्चाटन करता येते, हे दाखवून दिले.
प्रयोगात काय आढळले
- उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगातून फुफ्फुसात पसरलेला कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णत: नष्ट करता येत असल्याचे महत्त्वाचे निकष हाती लागले.
- या प्रयोगामुळे केवळ कोरोनाच नव्हे तर भविष्यात अशा प्रकारचा कोणताही विषाणू वा त्याचा व्हेरिएंट यांच्यावर रामबाण उपचार करता येऊ शकतील, हे नक्की झाले आहे.
या तंत्राला जीन सायलेन्सिंग असे नाव असून त्याचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला.
जीन सायलेन्सिंग तंत्राविषयी
- जीन सायलेन्सिंग तंत्राचा वापर १९९० च्या दशकातही करण्यात आला होता.
- या तंत्राच्या वापराने विषाणूची जनुके नष्ट करता येऊ शकतात.
-जीन सायलेन्सिंग तंत्राच्या साह्याने विकसित करण्यात आलेले औषध ४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत स्टोअर करता येऊ शकते.
- या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या इंजेक्शनच्या मदतीने गंभीर रुग्ण चार ते पाच दिवसांत बरा होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
- असे असले तरी सर्व चाचण्या पूर्ण होऊन बाजारात हे औषध येण्यासाठी किमान दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.