नवी दिल्ली : देशामध्ये बुधवारी कोरोनाचे ८९,७०६ नवे रुग्ण आढळून आले असून, या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४३ लाखांहून अधिक झाली आहे. एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील आहेत. या आजारामुळे आणखी १,११५ जणांचा मृत्यू झाला असून, बळींचा एकूण आकडा ७३,८९० वर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ४३,७०,१२८ झाली आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलला भारताने नुकतेच मागे टाकले होते. अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६५ लाखांवर आहे. अमेरिकेपेक्षा भारतातील कोरोना रुग्णांची संख्या २१ लाखांनी कमी आहे. कोरोनाच्या संसर्गातून आतापर्यंत ३३,९८,८४४ जण बरे झाले असून, अशा व्यक्तींचे प्रमाण ७७.७७ टक्के आहे.
कोरोना रुग्णांचा मृत्यूदर आता १.६९ टक्का इतका कमी राखण्यात यश आले आहे. देशात कोरोनाच्या ८,९७,३९४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, एकूण रुग्णांच्या २०.५३ टक्के हे प्रमाण आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ७ आॅगस्टला, ३० लाखांचा टप्पा २३ आॅगस्टला व ४० लाखांचा टप्पा ५ सप्टेंबरला ओलांडला. कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ८,०१२, कर्नाटकमध्ये ६,६८०, दिल्लीत ४,६१८, आंध्र प्रदेशात ४,५६०, उत्तर प्रदेशात ४,०४७, पश्चिम बंगालमध्ये ३,६७७, गुजरातमध्ये ३,१३३, पंजाबमध्ये १,९९० इतकी आहे.
चाचण्या ५ कोटी १८ लाख
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सांगितले की, ८ सप्टेंबर रोजी देशात ११,५४,५४९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. अशा चाचण्यांची एकूण संख्या आता ५,१८,०४,६७७ झाली आहे.
संशोधनाचे नियम पाळणार, नऊ औषध कंपन्यांची ग्वाहीलस विकसित करण्यासाठी संशोधनाचे नियम कटाक्षाने पाळण्यात येतील, अशी ग्वाही या प्रक्रियेत गुंतलेल्या नऊ औषध कंपन्यांनी दिली आहे. संशोधन प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे गाळून कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची शंका शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. अॅस्ट्राझेनिसा, मॉडेर्ना, फायझर, ग्लॅक्सो स्मिथक्लाईन, जॉन्सन अँड जॉन्सन, बायोएनटेक, मर्क, नोव्हॅक्स, सनोफी याच त्या नऊ कंपन्या आहेत.
कोरोना प्रतिबंधक लस ही माणसांसाठी सुरक्षित आहे, याची संपूर्ण खात्री पटल्यानंतरच ती सार्वत्रिक वापरासाठी उपलब्ध करण्यात येईल व मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल, असे या कंपन्यांनी म्हटले आहे. कोरोना प्रतिबंधक लस सर्वात प्रथम लोकांना उपलब्ध कोण करून देतो यासाठी विविध देशांमध्ये सुप्त स्पर्धा लागली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाºया निवडणुकीच्या आधी कोरोना प्रतिबंधक लस सर्वांना उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची विधाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केली आहेत. त्यामुळे शास्त्रीय प्रयोगांतील महत्त्वाचे टप्पे राजकीय दबावामुळे वगळण्यात येत असावेत, अशी शंकाही काही तज्ज्ञांनी बोलून दाखविली होती.