CoronaVirus News: देशात पहिल्यांदाच! डॉक्टर महिलेला एकाचवेळी दोन कोरोना व्हेरिएंटची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 10:18 PM2021-07-19T22:18:15+5:302021-07-19T22:20:04+5:30
CoronaVirus News: कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेऊनही डॉक्टर महिलेला कोरोनाची लागण
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात दररोज ५० हजारांहून कमी रुग्णांची नोंद होत आहे. मात्र कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स चिंता वाढवत आहे. कोरोना सातत्यानं रुप बदलत असल्यानं चिंतेत भर पडत आहे. त्यातच आता आसामच्या राजधानीतून समोर आलेल्या माहितीनं वैद्यकीय क्षेत्रासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. गुवाहाटीत एका महिला डॉक्टरला डबल व्हेरिएंटची लागण झाली आहे. एकाच वेळी दोन व्हेरिएंटची लागण झाल्याचा हा देशातला पहिलाच प्रकार आहे. विशेष म्हणजे महिला डॉक्टरनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. या महिलेला कोरोनाच्या डेल्टा आणि अल्फा व्हेरिएंटची लागण झाली आहे.
कोरोना विषाणूच्या दोन व्हेरिएंटची एकाचवेळी लागण झाल्याचा पहिला प्रकार बेल्जियममध्ये समोर आला होता. तिथे एका ९० वर्षीय महिलेला एकाचवेळी अल्फा आणि बीटा व्हेरिएंटची लागण झाली होती. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेनं कोरोना लसीचा एकही डोस घेतला नव्हता.
एका महिला डॉक्टरला कोरोनाच्या दोन्ही व्हेरिएंटची लागण झाल्याच्या माहितीला दिब्रूगढच्या आयसीएमआर-आरएमआरसीच्या नोडल अधिकारी डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी यांनी दुजोरा दिला. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची केस आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं.
महिला डॉक्टरच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे डॉक्टरची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली, अशी माहिती विश्वज्योती यांनी दिली. महिला डॉक्टरला एकाचवेळी कोरोनाच्या दोन व्हेरिएंटची लागण झाल्याचं अहवालात दिसून आलं. तर तिच्या पतीला अल्फा व्हेरिएंटची लागण झाली आहे. डॉक्टर महिलेची प्रकृती स्थिर असून सौम्य स्वरुपाची लक्षणं आहेत. त्यांना अद्याप रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही.