नवी दिल्ली : भारतासह जगभर कोरोनाने कहर मांडला आहे. यावर मात करण्यासाठी संशोधक तसेच कंपन्या लस शोधण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारतातही ही लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी तसेच नियमित परवान्यांसह देशातील कंपन्यांनाही याचे उत्पादन काम देता यावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डिपार्टमेंट आॅफ बायोटेक्नॉलॉजीच्या (डीबीटी) सचिव रेणू स्वरूप यांनी सांगितले. या लसीच्या चाचण्या भारतातही सुरू करता याव्यात यासाठी जागतिक आरोग्य संघटनेशी चर्चा सुरू आहेत.
जगातील अनेक कंपन्या या शोधासाठी धडपडत आहेत. सकारात्मक परिणाम दिसू लागताच लसीचे उत्पादन करण्यासाठी भारतीय कंपन्यांचीही मदत घ्यावी लागणार आहे. याबाबत भारतातील सीरम इन्स्टिट्यूट आणि इंग्लंडमधील औषधनिर्माण संस्था एस्ट्रोजेनिका यांनी गेल्या आठवड्यातच चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
जगातील ८ लसींचे काम सध्या तिसऱ्या टप्प्यात आहे. यातील ४ संस्था चीनमधील, तर अन्य मॉडर्ना, इनोव्हिओ, कुरवाक आणि फायझर या चार कंपन्या बनवीत आहेत. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्ससारखे देश कोट्यवधी रुपये मोजून या लसी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. भारतातील कंपन्यांनाही याचे उत्पादन करता येईल या दृष्टिकोनातून केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी अनेक कंपन्यांना अर्थसाहाय्याची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोनाबाबत नवे औषध, लस आदींची तपासणी करण्याची जबाबदारी डीबीटीला सोपविण्यात आली आहे. आम्ही सगळ्यात उत्तम कंपन्यांची निवड केली असून, आम्ही त्यांच्या सततसंपर्कात आहोत, असेही स्वरूप यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)