नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,00,82,778 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,069 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,321 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,91,981 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान सर्वच देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लाखो लोकांनी आतापर्यंत कोरोना लस घेतली आहे. याच दरम्यानन संशोधनातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कोरोनातून (Corona) बरे झालेल्या व्यक्तींना लसीचा दुसरा डोस (Second Dose) घेण्याची गरजच नसल्याचं ICMR (Indian Council of Medical Research) च्या नव्या संशोधनातून आता (Research) सिद्ध झालं आहे. ICMR Northeast आणि आसाम मेडिकल कॉलेज (Assam Medical Collage) यांनी एकत्रितरित्या केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. रिसर्चनुसार कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडिज (Antibodies) तयार झालेल्या असतात. पहिल्या डोसनंतर या अँटिबॉडिजमध्ये वाढ होऊन मुबलक प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, असं या संशोधकांनी जाहीर केलं आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 75 वयोगटातील 121 नागरिकांच्या अँटिबॉडिज टेस्टचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. कोरोना झालेले आणि न झालेले असे दोन्ही प्रकारचे नागरिक यात होते. लस घेण्यापूर्वी, पहिला डोस घेतल्यानंतर 25 ते 35 दिवसांनी आणि मग दुसऱ्या डोसनंतर 25 ते 35 दिवसांनी त्यांची अँटिबॉडी टेस्ट करण्यात आली. ज्यांना पहिला डोस घेण्याअगोदर कोरोनाची लागण होऊन गेली होती, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता पहिल्या डोसनंतरच वाढत असल्याचं लक्षात आलं. शिवाय कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींमधील अँटिबॉडिजच्या संख्येत दुसऱ्या डोसनंतर विशेष फरक पडत नसल्याचंही दिसून आलं.
गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशानं 30 कोटी लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 30 कोटी 16 लाख 26 हजार 28 जणांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 5 कोटी 34 लाख 1 हजार 103 जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना लस आणि कोरोना नियमांचं पालन या दोन मार्गांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. याच दरम्यान नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr V K Paul) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
...तर कोरोनाची तिसरी लाट रोखता येईल; नीती आयोगाच्या सदस्यांनी दिली महत्त्वाची माहिती
"जर आपण कोरोना नियमांचं नीट पालन केलं आणि कोरोना लस घेतली तर तिसरी लाट येईलच का? जास्तीत जास्त कोरोना लसीकरण आणि कोरोना नियमांचं योग्य पालन केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल" असं पॉल यांनी म्हटलं आहे. "असे अनेक देश आहेत, जिथं कोरोनाची दुसरी लाट आली नाही. जर आपण कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन केलं तर हा कालावधी निघून जाईल" असं देखील व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीचे प्रयत्न करत आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीम दुर्गम भागात सहज उपलब्ध करुन देण्याच्या योजनेवरही आता सरकार काम करत आहे.