नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसतं-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनाने घरातील कर्ती मंडळी हिरावून नेली असून आता फक्त सासू आणि सून उरल्या असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
एका महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांची मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. तीन महिन्यांत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमधील पालमपूरच्या समाना गावात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. घरातील कर्त्या पुरुषांचं निधन झाल्यानंतर आता फक्त सासू आणि सून राहिल्या आहेत. पती आणि मुलाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीपाठोपाठ मुलगा देखील गमवावा लागल्याने महिलेला मोठा मानसिक धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होतेय घट पण मृतांचा आकडा धडकी भरवणारा; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र असं असताना मृतांच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. कोरोना मृतांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत असताना मृतांचा आकडा वाढत असल्यामागचं नेमकं कारण आता तज्ज्ञांनी सांगितलं आहे. कोरोना आकडेवारीनुसार, 9 मे नंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्या कमी होत आहे.
कोरोना मृतांच्या आकड्यामध्ये मात्र कोणताच फरक पाहायला मिळत नाही. कोरोनामुळे जवळपास चार हजारहून अधिक लोकांना दररोज आपला जीव गमवाव लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. चंद्रकांच लहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्येत कमी पाहायला मिळत असली तरी मृतांच्या आकड्यावर याचा परिणाम हा 14 दिवसांनंतर पाहायला मिळेल. संसर्गाचे हे एक चक्र आहे. दुसऱ्या देशामध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये देखील काही दिवसांनी कोरोना मृतांच्या संख्येत घट झाली आहे. 9 मे पासून भारतात कोरोनाचा ग्राफ खाली येत असलेला पाहायला मिळत असल्याचं लहारिया यांनी म्हटलं आहे.