नवी दिल्ली: कोरोना लस आणि कोरोनाशी संबंधित औषधांवर आकारण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा करांवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकार कोरोना लसीवर ५ टक्के आणि ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि कोरोनाच्या औषधांवर १२ टक्के कर आकारणं का गरजेचं आहे, याची माहिती देण्यासाठी सीतारामन यांनी १६ ट्विट्स केली आहेत. कोरोना लस, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि कोरोनाच्या औषधांवर जीएसटी लावण्यात आल्यानं त्यांची किंमत कमी ठेवता येते, असं सीतारामन यांनी ट्विट्सच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. देशावर कोरोनाचं भीषण संकट असताना उपचारांसाठी आवश्यक उपकरणं आणि औषधांवरील कर माफ करायला हवा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली होती. त्यानंतर सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लस आणि औषधांवरील सामान्य करामुळे उत्पादकांना इनपुट टॅक्स क्रेडिट (टॅक्स रिफंड) मिळतं.. त्यामुळे त्यांना उपकरणं आणि औषधांच्या किमती कमी राखण्यास मदत मिळते. कोरोनाच्या औषधांवरील आयात शुल्क आधीच माफ करण्यात आलं आहे, असंदेखील सीतारामन यांनी सांगितलं आहे. 'औषधं आणि जीवनरक्षक उपकरणांना करात पूर्ण सूट दिल्यास त्याचा फटका देशातील उत्पादकांसोबतच ग्राहकांनादेखील बसेल. करात पूर्ण सवलत दिल्यास उत्पादक कच्चा माल आणि अन्य सामानांवर भरत असलेल्या करावरील (जीएसटी) इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना कच्च्या मालावर भरलेल्या कराचा बोजा ग्राहकांवर टाकावा लागेल. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल. यामुळे उत्पादनं महाग होतील,' असं सीतारामन यांनी ट्विट्समधून स्पष्ट केलं आहे.