CoronaVirus News: रुग्ण वाढू लागल्याने सामान्यांना धडकी; रविवारी १४२६४ नवे रुग्ण, मृत्यूदरात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 02:32 AM2021-02-22T02:32:53+5:302021-02-22T06:56:12+5:30
उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून त्यांचे एकूण प्रमाण १.३२ टक्के आहे. मृत्यूदराचे प्रमाण मात्र कमी होऊन तो १.४२ टक्के झाले आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग चौथ्या दिवशीही वाढ झाली असून रविवारी १४२६४ नवे रुग्ण आढळले व ९० जण मरण पावले. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून त्यांचे एकूण प्रमाण १.३२ टक्के आहे. मृत्यूदराचे प्रमाण मात्र कमी होऊन तो १.४२ टक्के झाले आहे.
जगभरात ११ कोटी १६ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ८ कोटी ६८ लाख जण बरे झाले व २४ लाख ७२ हजार जणांचा बळी गेला. जगात २ कोटी २३ लाख कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. अमेरिकेत २ कोटी ८७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी ८८ लाख जण बरे झाले.
महाराष्ट्र, केरळमध्ये ७४ टक्के रुग्ण
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमध्ये ७४ टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळमधील आहेत. मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर येथेही दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
काेराेना, वंशवाद आणि असमानतेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आराेग्यावर परिणाम
वाॅशिंग्टन- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तणाव, चिंता आणि उदासीनता वाढत असून, त्याचा परिणाम शिक्षणावर हाेत असल्याचे आढळून आले आहे. बाेस्टन विद्यापीठाने यासंदर्भात केलेल्या एका संशाेधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामागे राजकीय अस्थिरता, नियाेजनबद्ध वंशवाद, असमानता आणि काेराेना कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठाने सुमारे ३३ हजार विद्यार्थ्यांवर संशाेधन केले. विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि उदासीनता वाढत असल्याचे संशाेधकांना दिसून आले. मानसिक आराेग्यामुळे शैक्षणिक कामगिरीवर नकारात्मक परिणाम झाल्याचे ८३ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. तर दाेन तृतीयांश विद्यार्थ्यांमध्ये एकटेपणाची लक्षणे दिसून आली.