नवी दिल्ली : झायडस कॅडिला या कंपनीने बनविलेल्या झायकोव्ह-डी या कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी बुधवारपासून सुरू करण्यात आली असून, अशा प्रकारची ही दुसरी भारतीय लस आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था भारत बायोटेक या कंपनीच्या सहकार्याने बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी याआधीच सुरू करण्यात आली आहे.
झायडस कॅडिला या कंपनीने सांगितले की, झायकोव्ह-डी लसीच्या पहिल्या व दुसºया टप्प्यातील मानवी चाचणीला विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. झायडस कॅडिला कंपनीने बनविलेली लस ही माणसांवर उपचारांसाठी किती उपयोगी व सुरक्षित आहे, याची पडताळणी करण्याकरिता मानवी चाचणी दोन टप्प्यांत करण्यात येईल. पहिल्या व दुसºया टप्प्याला प्रत्येकी ८४ दिवस लागण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या लसीची एक मानवी चाचणी अहमदाबादमध्येही होणार आहे.
झायडस कॅडिला कंपनीच्या अहमदाबादमधील लसनिर्मिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये झायकोव्ह-डी या लसीच्या प्राण्यांवर केलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. त्यानंतर या लसीच्या पहिल्या व दुसºया टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास केंद्रीय औषध नियंत्रकांकडून परवानगी देण्यात आली. या कंपनीने म्हटले आहे की, उंदीर, ससे आदी प्राण्यांतील प्रतिकारशक्तीत झायकोव्ह-डी लसीमुळे वाढ झाल्याचे दिसून आले.प्रयोगांकडे लागले सर्वांचे लक्षभारत बायोटेक व आयसीएमआर बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्या आधीच सुरू झाल्या असून, अशा चाचण्यांपर्यंत पोहोचलेली ती पहिली भारतीय लस आहे. त्यानंतर झायडस कॅडिला कंपनीच्या लसीचा क्रमांक लागतो. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत तिसºया स्थानावर आहे. स्वदेशात लस बनविण्यात यश आले तर सर्वांना परवडेल अशा किमतीत ही लस सर्वांना देणे शक्य होणार आहे.