नवी दिल्ली : देशात सापडणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी जगभरात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण भारतातील होते. भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील देशांत सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित संख्याही भारतापेक्षा कमी आहे.
सोमवारी देशात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटून ७४ हजार ९६० होती. सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून ११२५ झाली. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ७२ हजार ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी भारतात ९४ हजार रुग्ण सापडले तर शनिवारीसुद्धा देशात जवळपास एवढेच रुग्ण सापडले होते. म्हणजे भारतात सुमारे एक लाख ८४ हजार नव्या कोरोनाबाधित वाढले. वर्ल्डोमीटर संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात अमेरिकेत एकूण ७३ हजार २०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले.
मृत्यूदर १.७ टक्के; जगात सर्वात कमी
१० लाखांमागे भारतातील ३१०२ रुग्ण आणि ५३ मृत्यू नोंदवले गेले आहेत. भारतातील मृत्यूदर जगात सर्वात कमी १.७ टक्के ही बाब दिलासादायक आहे. देशात एकूण रुग्णांची संख्या ४० लाख ८० हजार ४२२ इतकी झाली आहे, तर ३३ लाख २३ हजार ९५० जण यातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.६५ टक्के आहे.
भारतीय महिला शास्त्रज्ञाने तयार केली कोरोना लस
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील भारतीय प्राध्यापक सुमी विश्वास यांनी कोरोना विषाणूंची लस तयार केली आहे. जगातील सगळ्यात मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इंडिया इन्स्टिट्यूटशी भागीदारी करून या लसीच्या मानवी चाचणीला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली आहे. प्राध्यापक सुमी विश्वास यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील जेनर इंन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यासह काम केले आहे.
तीन महिन्यांनंतर चांगली होताहेत संक्रमित फुफ्फुसे
कोरोना विषाणूमुळे संक्रमित झाल्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान फुफ्फुसांचे होते. विषाणूच्या संक्रमणामुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झालेले अनेक संशोधनातून दिसले आहे. संशोधनादरम्यान असे दिसले की, गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांना फुफ्फुसांच्या समस्येला दीर्घकाळ तोंड द्यावे लागू शकते. दरम्यान, एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. नुकत्यात करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोनाची बाधा होऊन गेल्यानंतर फुफ्फुसांची बिघडलेली स्थिती आपोआप सुधारते.