नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांंची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांतील नव्या रुग्णांची सर्वात कमी संख्या रविवारी आढळून आली. या दिवशी १८,७३५ नवे रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या १ कोटी १ लाख ८७ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनातून ९७ लाख ६१ हजारांपेक्षा जास्त जण बरे झाले. त्यांचे प्रमाण ९५.८२ टक्के आहे. या संसर्गाच्या रुग्णांचा मृत्युदर आणखी खाली घसरून १.४४ टक्के झाला आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १,०१,८७,८५० असून, बरे झालेल्यांचा आकडा ९७,६१,५३८ आहे. बरे हाेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही मोठी दिलासा देणारी बाब ठरली आहे. देशात रविवारी २१,४३० जण बरे झाले व २७९ जण मरण पावले. आता बळींची एकूण संख्या १,४७,६२२ झाली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या २,७८,६९० असून, त्यांचे प्रमाण २.७३ टक्के आहे.
राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांमध्ये वाढराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्युदर २.५७ टक्के इतका आहे. रविवारी २,१२४ बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ बरे झाले आहेत. दिवसभरात ३,३१४ रुग्ण व ६६ मृत्युंची नोंद झाली.
युरोपात लसीकरणाला सुरुवातकोरोनाला अटकाव करणाऱ्या लसीकरण मोहमेला युरोपात रविवारपासून झोकात सुरुवात झाली. फ्रान्स, इटली, जर्मनी, ग्रीस, स्पेन, हंगेरी आदी युरोपीय देशांमध्ये एकाच वेळी लसीकरण मोहीम सुरू झाली. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांना प्रथम लस देण्यात येत आहे. फायझर-बायोएनटेकने विकसित केलेली लस या मोहिमेत वापरली जात आहे. ‘संपूर्ण युरोपीय एकतेचा हा एक भावोत्कट क्षण असून लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यात युरोप यशस्वी ठरेल,’ अशी प्रतिक्रिया युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयेन यांनी दिली.
कोरोनानंतरही जगामध्ये अनेक साथी येण्याची शक्यताकोरोनाची साथ ही काही जगातली अखेरची साथ नाही. यापुढेही अनेक साथी येणार आहेत. ते पाहता हवामानबदल व पशुसंवर्धनातील समस्यांचे निराकरण केल्याशिवाय मानवी आरोग्यात सुधारणा होणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी म्हटले आहे.