नवी दिल्ली : देशात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या २४ तासांत ५ हजारने घटली आहे. सध्या ४ लाख ६ हजार ८३३ जणांवर उपचार सुरू आहेत. या कालावधीत ३९ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले व ४३ हजार जण बरे झाले. या संसर्गाने आणखी ४९१ जणांचा मृत्यू झाला आहे.शनिवारी ४ लाख १२ हजार १५३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बरे झालेल्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. तीन कोटी १९ लाख ३४ हजार ४५५ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १० लाख ९९ हजार ७७१ जण बरे झाले. मृतांचा आकडा ४ लाख २७ हजार ८६२ वर पोहोचला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.३९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १.२७ टक्के आहे तर रुग्णांचा मृत्यूदर १.३४ टक्के आहे. कोरोनाचा दररोजचा व आठवड्याचा संसर्गदर अनुक्रमे २.२७ व २.३८ टक्के आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे ५० कोटी ६८ लाख १० हजार ४९२ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. तर ४८ कोटींहून अधिक कोरोना चाचण्या देशात पार पडल्या आहेत.जगभरात २० कोटी ३० लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील १८ कोटी २३ लाख रुग्ण बरे झाले तर ४३ लाख लोकांचा बळी गेला आहे. १ कोटी ६३ लाख रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ९८ हजार लोकांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अमेरिकेत उपचार घेणाऱ्यांची संख्या ६० लाखांवर पोहोचली असून तिथे आजवर ६ लाख ३२ हजार जण मरण पावले. जगात सर्वाधिक रुग्ण म्हणजे ३ कोटी ६५ लाख रुग्ण अमेरिकेत असून त्यातील २ कोटी ९८ लाख जण बरे झाले.इंग्लंडमध्ये फैलाव झाला कमीइंग्लंडमध्ये कोरोना साथीचा फैलाव कमी होऊ लागला आहे. त्या देशाच्या काही भागांत तरुणांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या आठवड्याच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. परिस्थिती सुधारत असली तरी कोरोना प्रतिबंधक नियम आणखी शिथिल करण्यास इंग्लंडचे सरकार तयार नाही.
CoronaVirus News: देशात उपचाराधीन रुग्ण संख्येत ५ हजारांनी घट; ३९ हजार कोरोनाबाधित; बरे झाले ४३ हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 6:08 AM