नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ९० हजार ४०१ झाली आहे. तर आतापर्यंत देशात १५ हजार ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. मात्र जोपर्यंत कोरोनावर लस तयार होत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल. तसेच मास्कचा वापर करत राहावा लागेल, असं मत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. 'आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियाना'च्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण सर्वांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात चढ-उतार अनुभवले आहेत. आपल्या सामाजिक आयुष्यातही, गावांमध्ये, शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं येतात. मात्र, संपूर्ण जगावरच एवढे मोठे संकट येईल, याची कल्पना कधी केली नव्हती. हे असे संकट आहे की, जिथे लोक इच्छा असूनही एकमेकांची मदत करू शकत नाहीत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, कोरोनाचं एकच औषध आपल्याला माहिती आहे ते म्हणजे एकमेकांमध्ये अंतर ठेवणं. चेहरा झाकणं, चेहऱ्यावर कापड बांधणं, जोपर्यंत लस तयार होत नाही तोपर्यंत याच औषधाने हा आजार रोखू शकतो, असा डोस नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दिला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रकारे संकटाचं संधीत रुपांतर केलं आहे. योगी आदित्यनाथ प्राण पणाला लावून ते काम करत आहेत, तसंच देशातील इतर राज्यांनाही या योजनेतून खूप काही शिकायला मिळेल, इतर राज्यही प्रेरणा घेतील, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. आज जगभरात कोरोनाचं मोठं संकट आहे, अशा काळात उत्तर प्रदेशनं जे धाडस दाखवलंय, जो संवेदनशीलपणा दाखवलाय, जे यश मिळवलंय, ज्याप्रकारे कोरोनाविरोधात लढत आहे, ज्या प्रकारे परिस्थिती हाताळलीय, ते सर्व अभूतपूर्व आणि कौतुकास्पद आहे, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.
लॉकडाऊनमुळे देशाच्या शहरी भागांतील मजूर मोठ्याप्रमाणावर आपापल्या गावी परतले आहेत. या पार्श्वभूमीवर योगी सरकारचे 'आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान' महत्त्वपूर्ण पाऊल ठरण्याची शक्यता आहे. या अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात १ कोटी २५ लाख रोजगार दिले जातील, असा योगी सरकारने दावा केला आहे.