CoronaVirus News: रेल्वे रोजच चुकतेय रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 02:46 AM2020-05-26T02:46:04+5:302020-05-26T02:46:38+5:30
रेल्वेगाड्यांचा मार्ग चुकण्याचा प्रकार साधारण चार दिवसांपूर्वी सुरू झाला.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सध्या अमुक एका शहरासाठी निघते; परंतु ती भलत्याच ठिकाणी पोहोचते. यामुळे प्रवाशांचे वेगळेच हाल होत आहेत. रेल्वे ठरलेल्या स्थानकावरच पोहोचतील, त्या मार्ग चुकणार नाहीत यासाठी अजून उपाय सापडलेला नाही. मंत्रालयाचे म्हणणे असे आहे की, रेल्वेमार्गांवर खूपच दबाव आहे. याच कारणांमुळे काही रेल्वेगाड्या बदललेल्या मार्गांनी चालविल्या जात आहेत. रेल्वे सगळ्या गाड्यांवर सतत लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत जवळपास एक डझनपेक्षा जास्त रेल्वेगाड्या या प्रकारे बदललेल्या मार्गाने चालविल्या जात आहेत.
रेल्वेगाड्यांचा मार्ग चुकण्याचा प्रकार साधारण चार दिवसांपूर्वी सुरू झाला. मुंबईहून गोरखपूरसाठी निघालेली रेल्वे ओदिशातील राऊरकेला पोहोचली. अशीच एक रेल्वे सोमवारी मार्ग भटकून नागपूरला पोहोचली. रेल्वेगाड्यांचे हे असे मार्ग भटकणे सतत होत आहे. परंतु रेल्वेचे म्हणणे असे की, हे भटकणे नाही. हा आम्हीच बदललेल्या मार्गावर रेल्वे चालविण्याचा भाग असून तसे वाहतुकीमुळे केले गेले. असे केले नसते तर रेल्वेगाड्या एकाच मार्गावर उभ्या राहिल्या असत्या.