हरिद्वार : साेमवती अमावास्येच्या पर्वावर हाेणाऱ्या महाकुंभाच्या शाहीस्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी काेविड नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. शाहीस्नानासाठी आलेल्या अनेक आखाड्यांतील साधू-संत आणि महंतांना काेराेना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची झाेप उडाली आहे. गर्दी नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश येत असून काेविड नियमांचे सक्तीने पालन करण्यात पाेलिसांनी असमर्थता व्यक्त केली. शाहीस्नानापूर्वी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यासह अनेक संतांचे काेराेना रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रेस करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी महाराज यांचीही प्रकृती खालावली आहे. रविवारपासून १० हून अधिक संत पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व संतांना शाहीस्नान करता आले नाही. हरिद्वारला येण्यापूर्वी भाविकांनी काेराेना नसल्याचा रिपाेर्ट साेबत आणणे बंधनकारक केले हाेते. हरिद्वारमध्येही दरराेज ५० हजार जणांची चाचणी करण्यात येत आहे.
सीसीटीव्हीची नजरमहाकुंभावर ३५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. त्यापैकी १०० कॅमेरे सेन्सरने सज्ज असून मास्क न घालणाऱ्या व्यक्तींचा त्यातून तत्काळ ॲलर्ट मिळणार आहे. हर की पाैडी, सुभाष घाट, ब्रह्मकुंड इत्यादी ठिकाणी अशा कॅमेऱ्यांची संख्या जास्त आहे. काेराेना नियमांसाेबतच सुरक्षेच्या दृष्टीनेही परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे.
चेंगराचेंगरीची भीतीस्नानासाठी लाखाे भाविकांनी गर्दी केली. अनेक भाविक विनामास्क स्नान करताना दिसून आले. सर्वत्र साेशल डिस्टन्सिंगची पायमल्ली हाेताना आढळून आले. सातत्याने काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, सक्ती केल्यास घाटांवर चेंगराचेगरी हाेण्याची भीती पाेलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी व्यक्त केली.
मथुरेतील महाेत्सव रद्दकाेराेनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन यावर्षी मथुरेतील नवरात्री महाेत्सव रद्द करण्यात आला आहे.