CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २७ लाख ६७ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:45 AM2020-08-20T03:45:58+5:302020-08-20T03:46:08+5:30
तसेच या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या २० लाखांहून अधिक झाली ही दिलासादायक बाब आहे. कोरोनामुळे आणखी १,०९२ जणांचा बळी गेला आहे.
नवी दिल्ली : देशामध्ये बुधवारी कोरोनाचे ६४,५३१ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २७ लाख ६७ हजारांहून अधिक झाली आहे. तसेच या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या २० लाखांहून अधिक झाली ही दिलासादायक बाब आहे. कोरोनामुळे आणखी १,०९२ जणांचा बळी गेला आहे.
या आजारामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ५२,८८९ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.९१ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात केलेली वाढ, त्यामुळे रुग्ण सापडण्याचे वाढलेले प्रमाण व त्वरित उपचार या तीन गोष्टींमुळे या साथीचा फैलाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी राखण्यास मदत झाली आहे. केंद्र व राज्य सरकारांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले.
>६,७६,५१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
सध्या देशात ६,७६,५१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २०,३७,८७० जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने ७ आॅगस्ट रोजी २० लाखांचा टप्पा ओलांडला होता.
>चाचण्यांची एकूण संख्या ३ कोटी १७ लाख
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, १८ आॅगस्ट रोजी ८,०१,५१८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
आता या चाचण्यांची एकूण संख्या ३,१७,४२,७८२ झाली आहे. दररोज चाचण्यांच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. साथीचा फैलावही कमी झाला आहे.