नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लसीबाबत व ती लस घेणाऱ्या प्रवाशांबाबत भारताचा काही देशांशी सामंजस्य करार झाला आहे. अशा देशांतून भारतात आलेल्या व लसीकरण झालेल्या विदेशी प्रवाशांची विमानतळावर यापुढे कोरोना चाचणी करण्यात येणार नाही तसेच त्यांना आता होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचीही गरज नाही. मात्र, या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. विदेशी प्रवाशांबाबत असलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारने बुधवारी जारी केली.भारताने दिलेले कोरोना लस प्रमाणपत्र जे देश मान्य करतात, त्या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठीच कोरोनाविषयक नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, युरोपमधील काही देश, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, चीन, ब्राझिल, बांगलादेश, बोस्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आदी देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशासाठी यापुढेही काही अतिरिक्त नियमांचे पालन करावे लागणार आहे. लस न घेतलेल्या प्रवाशांसाठी कडक नियमकेंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे की, विदेशी प्रवाशाने जर लसीचा एकच डोस घेतला असेल किंवा लसच घेतली नसेल, तर त्यांची भारतातविमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येईल व त्यानंतरच त्यांना इच्छित ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात येईल.भारतात दाखल झाल्यानंतर अशा प्रवाशांनी आठवडाभर होम क्वारंटाइनमध्ये राहणे आवश्यक आहे. त्यानंतर आठव्या दिवशी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येईल. जरी ती चाचणी निगेटिव्ह आली तरी आणखी सात दिवस त्या विदेशी प्रवाशाने स्वत:च्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवायचे आहे.
CoronaVirus News: लसीकरण झालेल्या विदेशी प्रवाशांची चाचणी नाही; भारताची मार्गदर्शक तत्त्वे विशिष्ट देशांसाठीच लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 6:59 AM