नवी दिल्ली: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात येईल. मात्र या पॅकेजमध्ये देशातल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काही असेल, असं मोदी म्हणाले. सध्या जग अनुभवत असलेलं संकट अभूतपूर्व आहे. मात्र भारत याच संकटाचा वापर संधी म्हणून करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.स्वावलंबी भारत घडवण्याची पंचसुत्री पंतप्रधान मोदींनी सांगितली. स्वावलंबी भारताचे पाच प्रमुख स्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. 'स्वावलंबी भारत घडवण्यासाठी अर्थव्यवस्था, पायाभूत सोयीसुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र, मागणी यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. स्वावलंबी भारताचं स्वप्न साकारण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. पायाभूत सोयीसुविधांना बकळटी द्यावी लागेल. स्वावलंबी भारतासाठी यंत्रणेत बदल करावे लागतील. ती अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही असायला हवी. लोकसंख्याशास्त्र आपलं सामर्थ्य आहे. तिचा पुरेपूर वापर करायला हवा. भारतीय बाजारातील मागणी हीदेखील आपली जमेची बाजू आहे. मागणी आणि पुरवठा साखळीतले सगळे घटक सशक्त करायला हवेत. त्यांचा पूर्ण क्षमतेनं वापर करण्याची गरज आहे,' असं मोदी म्हणाले.
CoronaVirus News: ...तरच भारत स्वावलंबी होईल; पंतप्रधान मोदींनी सांगितली पंचसुत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 8:58 PM