नवी दिल्ली – कोरोना संकटाच्या काळात देशासमोर आर्थिक आव्हानंही मोठ्या प्रमाणात आहेत. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित केले. त्यावेळी मोदी यांनी अनेक आर्थिक विषयांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना व्हायरस या संघर्षाच्या स्थितीत ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाला आहे. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. पण त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचं आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मला देशाच्या क्षमतेवर, प्रतिभेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे, म्हणूनच विश्वास आहे की, आम्ही पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला वेगवान गती देऊ. कोरोनाने भलेही अर्थव्यवस्थेचा वेग कमी केला असेल परंतु लॉकडाऊन मागे सोडून भारताने अनलॉक १ च्या टप्प्यात प्रवेश केला आहे असं ते म्हणाले.
तसेच जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरु होतं. त्यावेळी भारताने मोठे निर्णय घेतले, वेळीच लॉकडाऊन लागू केले. या काळात आपल्या सुविधांमध्ये वाढ केली. त्यामुळेच जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्थिती बऱ्यापैकी चांगली होती. अर्थव्यवस्थेला मजबूत करणे सरकारचं प्राधान्य आहे. यासाठी केंद्र सरकार विविध निर्णय घेत आहे. यामध्ये तातडीच्या निर्णयासोबतच दीर्घकालीन फायदा देणाऱ्या निर्णयांचाही समावेश आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत ७४ कोटी लोकांना रेशन दिलं. स्थलांतरित मजुरांना मोफत अन्नधान्य दिलं. आतापर्यंत गरीब कुटुंबाच्या खात्यावर ५३ हजार कोटी रुपये टाकले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
त्याचसोबत आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पाच विषयांवर लक्ष देणे गरजेचे आहे. यात Intent, Inclusion, Investment, Infrastructure आणि Innovation हे समाविष्ट आहे. म्हणजेच हेतू, समावेश, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि नाविन्याचा समावेश आहे. लॉकडाऊन काळात ८ कोटी गॅस सिलेंडर मोफत दिले. खासगी कर्मचाऱ्यांना २४ टक्के ईपीएफओने सरकारने दिला. तसेच शेतकऱ्यांबद्दल अनेक निर्णय घेतले. यात शेतकरी आता कुठेही आपला माल विकू शकतो. कोल सेक्टरमध्येही अनेक निर्बंध उठवले आहेत. मायनिंग नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.