नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांचे फार हाल होत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनदरम्यान, सर्वसामान्य लोकांना अन्नपाणी आणि रोख रकमेची टंचाई जाणवत आहे, अशा काळात प्रशासनाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली जात आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमधील भदोही येथे प्रशासनाकडून पीएम केअरसाठी प्रत्येकी १०० रुपयांची वसुली करण्यात आली आहेत. या प्रकारावरून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. त्यात त्या म्हणतात की,’ एक सल्ला: जेव्हा जनता त्रस्त आहे, अन्न, पाणी, रोख रकमेची टंचाई आहे. अशा काळात सरकारी वर्गाकडून पीएम केअरसाठी १००-१०० रुपयांची वसुली केली. अशा परिस्थितीत पीएम केअरचे सरकारी ऑडिट होणेच योग्य ठरेल,’
या ट्विटमधून प्रिकंका गांधी यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे. ‘देशातून पळालेल्या बँक चोरांचे ६८ हजार कोटी रुपये माफ करण्यात आले आहे. त्याचा हिशोब झाला पाहिजे. संकटकाळात जनतेसमोर पारदर्शकपणे कारभार होणे गरजेचे आहे. यामध्ये जनता आणि सरकार दोघांचेही हित आहे.’ असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.