coronavirus : अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी पाठ फिरवली, रामनामाचा जप करत मुस्लिमांनी माणुसकी दाखवली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 03:23 PM2020-03-29T15:23:05+5:302020-03-29T15:41:16+5:30
बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता, पण कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईकांनीही रविशंकर यांच्या घरी येणं टाळले.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा कहर जगभरात वाढत आहे. भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी संपूर्ण देशात पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, काही बेजबाबदार लोकं नियमांचं उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे एका पतीने समाजहित लक्षात घेऊन पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना घरी पाठल्याची बाब उघडकीस आली. तर, उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे एका हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन अंत्यविधी पार पाडला.
बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता, पण कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईकांनीही रविशंकर यांच्या घरी येणं टाळले. आप्तेष्ठ आणि सगेसोयरेही मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येईनात. त्यावेळी, रविशंकर यांच्या घराशेजारील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन रविशंकर यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे आपल्या खांद्यावर त्यांचं प्रेय स्मशानभूमीत घेऊ जाताना... राम नाम सत्य है.. असा रामनामाचा जपही या मुस्लीम बांधवांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शशी थरुर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत, माहिती दिली. तसेच, हाच आपला भारत. हेच भारताचे स्पीरीट असल्याचे थरुर यांनी म्हटले. तसेच, हीच भारत देशाची कल्पना आहे, याच्या सुरक्षेसाठी, जतन करण्यासाठी आणि प्रतिकारासाठी आपण प्रार्थना करु, असेही थरुर यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे माणुसकी पावला-पावलावर दिसून येत आहे, उपाशी माणसाला अन्न देऊन, भुकेल्याची भूक भागवून नागरिक आपलं कर्तव्य बजावत आहेत. तर, पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. हिंदू-मुस्लीम-शीख-ईसाईसह देश एकत्र आला असून फाईट अगेन्स्ट इंडिया... चा नारा देशवासियांनी दिला आहे. भारतीयांचे हे स्पीरीट पाहिल्यानंतर नक्कीच कोरोनाला लवकरच भारतातून पळवून लावण्यात आपण यशस्वी होऊ शकते, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
The true Soul & spirit of India. This is the #IdeaofIndia we are pledged to preserve, protect & defend. https://t.co/8Bhi4wm6HD
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 29, 2020
दरम्यान, आग्रा येथील न्यू विजय नगर कॉलनीतील नगला धानी भागात राहणारे देवकीनंदन त्यागी यांची पत्नी ममता यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री दहा वाजता त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला. त्यावेळी त्यांचे हितचिंतक आणि जवळचे नातेवाईक जमले होते. त्यावेळी भावनाविवश झालेले पोलीस देखील काही करू शकले नाही. अखेर पतीने मोठा निर्णय घेत सर्वांना घरी परत जाण्यास सांगितले. देश हितासाठी त्याने घेतलेल्या निर्याणाचा जे बेजाबदार विनाकारण घराबाहेर पडतात त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. पत्नी ममता यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराला लोकांनी गर्दी केली. मात्र, देवकीनंदन त्यागी यांनी लोकांसमोर हात जोडून लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही गर्दी करू नका आणि सगळ्यांनी घरी जा असं सांगितलं आणि केवळ १० नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले. तर, दुसरीडे बुलंदशहरमध्ये मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन माणूसकी जपत, हिंदू बांधवाच्या अंत्यसंस्कारासाठी घेतलेला पुढाकार हा भारत देशातील विविधतेत नटलेल्या एकतेचं प्रतिक आहे.