नवी दिल्ली : देशातील 40 कोटी लोकांना अजूनही कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका आहे, तर दोन तृतीयांश लोकांमध्ये कोरोना व्हायरसविरूद्ध अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी नुकत्याच झालेल्या चौथ्या सीरो सर्व्हेचा हवाला देत मंगळवारी ही माहिती दिली.
डॉ. बलराम भार्गव म्हणाले, 'चौथ्या सीरो सर्वेक्षणात 6 ते 17 वर्षे वयोगटातील 28975 लोक आणि 7252 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी 62 टक्के लोकांनी लस घेतली नाही, तर 24 टक्के लोकांनी एक डोस घेतला आणि 14 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले होते'. तसेच, या सर्वेक्षणात सीरो-प्रीव्हलेंस 67 टक्के आढळल्याचे डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.
याचबरोबर, 85 टक्के आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात कोरोनाची प्रकरणांमधील घट आणि लसीकरण, याशिवाय डॉ. बलराम भार्गव यांनी लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, ज्या लोकांनी अँटी-कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनीच प्रवास केला पाहिजे.
दरम्यान, देशासह जगभरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट मोठी होती. यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेली परिस्थिती पुन्हा तिसऱ्या लाटेत येऊ नये आणि त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, IIT कानपूरचा दावाआयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की, तिसरी लाट दुसर्या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल. तसेच, ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, तिसर्या लाटेचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही गेल्या एका महिन्यात आमच्या मॉडेलच्या आधारे बरीच गणना केली आहे. यामध्ये असे निदर्शनास आले की, तिसरी लाट दुसर्या लाटेप्रमाणे इतकी प्रभावशाली नसेल. यात आम्ही तीन शक्यता वर्तविल्या आहेत. जर ऑगस्टच्या अखेरीस एखादा नवीन व्हेरिएंट आला, जो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने पसरेल, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान तिसरी लाट येईल. तिसरी लाट पहिल्या लाटेप्रमाणे असेल.