नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केले आहे. मास्क वापरणे आणि बाधित व्यक्तीपासून दूर राहणे हाच सध्यातरी उपाय दिसत आहे. (coronavirus in India ) कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे विमानसेवा मर्यादित झाली असून, तपासणी आणि कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यानंतरच प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली जात आहे. मात्र असे असले तरी विमान प्रवासादरम्यानही अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील विमानतळावर कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून हाँगकाँगसाठी ११८ प्रवासी रवाना झाले होते. मात्र नऊ तासांच्या या प्रवासादरम्यान, तब्बल २२ प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. (Covid-19 Negative at the airport, but 52 passengers were infected with corona in the air during the journey)
४ एप्रिल रोजी विस्तारा फ्लाइटमधून ११८ प्रवासी दिल्लीतून हाँगकाँगसाठी रवाना झाले होते. विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी या सर्वांचे कोरोना रिपोर्ट तपासण्यात आले होते. यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे दिसून आले होते. मात्र विमानाने दिल्लीतून हाँगकाँगसाठी उड्डाण केल्यावर ९ तासांनी ते हाँगकाँगला पोहोचले. तिथे या प्रवाशांची पुन्हा एकदा कोरोना तपासणी केली असता ५२ प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
दरम्यान, भारतातून हाँगकाँगला पोहोचलेले ५२ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाची माहिती ही ७२ तासांनंतर होते. त्यामुळे केवळ ९ तासांच्या प्रवासात सर्व प्रवासी कोरोनाबाधित कसे झाले हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.