नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग आणखी फैलावू नये यासाठी राजस्थान व झारखंडने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. या निर्णयाचे अनुकरण देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी करावे असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन कुठेही थुंकण्याची सवय अनेकांना आहे. या सवयीमुळे कोरोना, क्षयरोग, स्वाईन फ्लू आदी संसर्गजन्य रोग पसरतात. जिथे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात अशा ठिकाणी कुठेही थुंकण्याच्या सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे.डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, लोकांनी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नयेत तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेही केले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास तसेच तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालून आपण केवळ स्वच्छ भारत नव्हे तर स्वस्थ भारत निर्माण करू शकू. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५मधील तरतुदीनूसार केंद्र सरकारने १ मे रोजी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांकडून शिक्षेबरोबरच दंड वसूल करण्याचा राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना अधिकार आहे तसेच दारु, पान, गुटखा, तंबाखू आदींचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यास बंदीही घालता येऊ शकते.दरवर्षी १२ लाख लोकांचा मृत्यूभारतातील २६.८ कोटी लोक तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन किंवा धूम्रपान करतात असे ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणात म्हटले आहे. या व्यसनाशी संबंधित आजार होऊन देशात दरवर्षी १२ लाख लोक मरण पावतात. त्यामुळे धूम्रपान असेल किंवा तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन, ते जितक्या लवकर सोडता येईल तेवढे आरोग्यासाठी चांगले, असेही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.