हैदराबाद: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज, केंद्राकडून राज्यांना मिळणारी वागणूक यावरुन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तीव्र शब्दांत भाष्य केलं आहे. मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. त्यातून त्यांनी केवळ आकड्यांचा खेळ केला आहे, अशा शब्दांत राव यांनी तोंडसुख घेतलं. केंद्राकडून राज्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 'मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे केवळ हवा आहे. केंद्रानं स्वत:ची प्रतिष्ठा कमी करुन घेतली आहे,' असा आरोप करत राव यांनी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्यांना घेता येणाऱ्या कर्जाचा संदर्भ दिला. राज्यांना कर्ज घेण्यासाठी असलेल्या अटी वाढवण्यात आल्याचं राव यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्र्यांना जीडीपी वाढवायचा होता की मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींपर्यंतच्या पॅकेजपर्यंत पोहोचायचं होतं, असा सवाल त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांचा दाखला देत विचारला.'केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज अतिशय क्रूर आहे. त्यामधून सामंतशाही आणि हुकूमशाही दिसते. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही केंद्राकडे असं पॅकेज मागितलं नव्हतं,' असं राव म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केंद्रानं घेतलेल्या अनेक निर्णयांचं राव यांनी स्वागत केलं आहे. मात्र पॅकेजमुळे निराशा झाल्याचं मत राव यांनी व्यक्त केलं. कोरोनामुळे राज्यांचा महसूल घटला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना निधीची आवश्यकता आहे, असं राव म्हणाले. लोकांपर्यंत विविध माध्यमांतून मदत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे निधी मागत आहोत. मात्र तुम्ही आम्हाला भिकाऱ्यासारखं वागवता. केंद्राचं काम काय असतं? देशात अशाप्रकारे सुधारणा राबवल्या जातात का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. केंद्रानं जे काही जाहीर केलं त्याला पॅकेज म्हणायचं का, असा प्रश्न मला पडला आहे. संघराज्य पद्धतीत अशा प्रकारचं धोरण असू शकत नाही, असं राव म्हणाले.
CoronaVirus News: "मोदींचं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक; ते राज्यांना भिकाऱ्यासारखं वागवताहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 3:06 PM