CoronaVirus: सुप्रीम कोर्टात महिन्यात २१५ प्रकरणे निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 05:42 AM2020-04-27T05:42:46+5:302020-04-27T05:43:01+5:30
लॉकडाऊनच्या काळात दोन न्यायपीठे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दररोज तातडीच्या प्रकरणांची सुनावणी घेत आहेत.
नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान महिनाभरात सर्वोच्च न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायनिवाडा करून २१५ प्रकरणे निकाली काढली, तर ५९३ प्रकरणांची सुनावणी केली. देशभरात कोरोनाचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशव्यापी लॉकडाऊन लागू
करण्यापूर्वी दोन दिवस आधीच २३ मार्चपासून वकील आणि पक्षकारांना कोर्टाची दरवाजे बंद केली होती; परंतु व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायदानाचा मार्ग खुला केला होता. सर्वोच्च न्यायालय महिनाभरात सरासरी ३,५०० प्रकरणे निकाली काढते. लॉकडाऊनच्या काळात दोन न्यायपीठे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दररोज तातडीच्या प्रकरणांची सुनावणी घेत आहेत.
सामान्यत: १६ न्यायापीठांत सुनावणी केली जाते. कोर्टाच्या आकडेवारीनुसार २३ मार्च ते २४ एप्रिलदरम्यान कामकाजाच्या १७ दिवसांत एकूण ८७ न्यायपीठांनी ५९३ प्रकरणांची सुनावणी घेतली. देशव्यापी लॉकडाऊनच्या पहिला टप्पा २५ मार्चपासून सुरू झाला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने २३ मार्चपासूनच वकील आणि पक्षकार, याचिकाकर्त्यांच्या न्यायालयीन आवरातील प्रवेशावर निर्बंध घातले होते. लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २४ एप्रिल रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वोच्च न्यायालयाने ८४ फेरविचार याचिका निकाली काढल्या. या अवधीत ८७ पैकी ३४ न्यायपीठांत मुख्य प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली, तर ५३ न्यायपीठांनी फेरविचार याचिका निकाली काढल्या. मुख्य ३९० प्रकरणे आणि मुख्य प्रकरणांशी संबंधित २०३ प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली.