नवी दिल्ली - भारतात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट आता जवळपास ओसरू लागली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारतात सुरू झालेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत एप्रिलच्या अखेरीस चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली होती. मात्र ९ मेनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होऊ लागली असून, देश कोरोनाविरोधात योग्य पद्धतीने लढत असल्याचे ते संकेत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठल्यानंतर आता ही लाट कधीपर्यंत सुरू राहील, असा प्रश्न आता विचारला जात आहे, या प्रश्नाचे उत्तर आता सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि मुख्य डॉक्टर जुगल किशोर यांनी दिले आहे. (the second wave of coronavirus will end in the next two weeks in India)
जर सारे काही व्यवस्थित घडले तर कोरोनाची दुसरी लाट कमाल दहा दिवसांपासून ते दोन आडवड्यांदरम्यान संपुष्टात येईल, अशी शक्यता डॉ. जुगल किशोर यांनी वर्तवली.
मात्र जुगल किशोर यांनी सांगितले की, भारतामधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे ओसरणे हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. यामध्ये सर्वात प्रमुख आहे ते म्हणजे आपण सर्वांनी कोविडबाबतच्या नियमांचे कठोरपणे पालन करावे आणि या विषाणूला रोखण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी. मात्र जर रस्त्यांवर लोकांची गर्दी कायम राहिली. बाजारात वर्दळ राहिली तर कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा कालावधी तेवढाच अधिक प्रमाणात वाढेल. याशिवाय लसीकरणाचा वेग वाढवला आणि अधिकाधिक लोकांचे लसीकरण केले तर आपण या लाटेला वेळेवर थोपवण्यात यशस्वी ठरू. लस मिळाल्याने या विषाणूला पसरण्यापासून रोखता येऊ शकेल.
डॉ. जुगल किशोर यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या. सक्रिय रुग्णांच्या संख्येत जसजशी घट होईल. तसतसा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोपही कमी होईल. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी यासंबंधीची लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत पुढचे दहा दिवस खूप महत्त्वपूर्ण ठरतात. केवळ रुग्णांसाठीच नव्हेतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांसाठीही यादरम्यान काही त्रास न जाणवल्यास ती चांगली बाब आहे. मात्र त्रास जाणवल्यास त्याला त्वरित आयसोलेट केले पाहिजे.
सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होणे हे रुग्णांचे कॉन्टॅक्ट कमी होत असल्याचा पुरावा आहेत. ही बाब कठोर नियमांमुळे शक्य झाली आहे. देशातील बहुतांश लोक कोरोनाबाधित झाले आहेत. यामधील काही जण हे औषधांच्या माध्यमातून तर काहीजण प्रबळ प्रतिकार शक्ती मुळे कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच या लोकांच्या संपर्कात असलेल्यांपैकी मोजक्याच लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज भासली असेल.