कोलकाता - देशात निर्माण झालेले कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर रूप धारण करत चालले आहे. सर्वसामान्यांसोबतच सार्वजनिक, ,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमामुळे कोरोनाच्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशात अजून एका आमदाराचा बळी घेतला आहे.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते तमोनाश घोष यांचे आज कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. मे महिन्याच्या अखेरीस त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. तमोनाश घोष हे दीर्घकाळापासून तृणमूल काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्या निधनाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
तमोनाश घोष यांना ट्विटरवरून श्रद्धांजली देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, फल्टा येथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि १९९८ पासून पक्षाचे खजिनदार असलेले तमोनाश घोष यांचे निधन झाले हे ऐकून खूप दु:ख झाले. दीर्घकाळापासून ते आमच्यासोबत होते. पक्ष आणि जनतेप्रति ते समर्पित होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी मोठे योगदान दिले होते.
ममता बॅनर्जी यांनी अजून एक ट्विट करून घोष यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली आहे. त्यात त्या म्हणतात की, घोष यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. मी आम्हा सर्वांच्यावतीने त्यांची पत्नी झरना आणि दोन मुली, तसेच हितचिंतकांप्रति संवेदना व्यक्त करते.
इतर महत्त्वाच्या बातम्या