नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात सुद्धा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१४९ वर पोहचली आहे. तर १४९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचा संसर्ग एकूण ५१४९ लोकांना झाला आहे. तर यामुळे १४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, देशातील कोरोना बाधित ४०२ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय, गेल्या २४ तासांत देशात ७७३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात एक हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात बुधवारी ६० नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत १०७८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये फक्त मुंबईत आज ४४ नवे रुग्ण सापडले आहेत. तर, पुण्यात ९, नागपूरमध्ये ४ आणि अहमदनगर, अकोला व बुलढाणा येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारडून विविध उपाययोजना सुरु आहेत.
जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ८१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास ५० हजारहून जास्त लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे. स्वीडनमध्ये २० तासांत १०० हून जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर फ्रान्समध्येही कोरोनामुळे मृतांच्या आकडा दहा हजार पार केला आहे.