coronavirus: अनलॉक ४ मध्ये प्रवासाला गती मिळणार, रेल्वे अजून १०० स्पेशल ट्रेन चालवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 07:02 AM2020-09-02T07:02:54+5:302020-09-02T07:04:27+5:30
सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध आता बऱ्यापैकी हटवण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे. मात्र प्रवासाच्या साधनांवर सध्यातरी मर्यादा असल्याने प्रवास आणि दळणवळण अद्यापतरी अडचणीचे ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १०० हून अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या चालवण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी या रेल्वे गाड्या जिथून सो़डल्या जातील आणि जिथे पोहोचतील अशा राज्यांच्या सरकारांकडे रेल्वेकडून संपर्क साधला जात आहे. या राज्यांकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर या अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची औपचारिक घोषणा केली जाईल. मात्र किती विशेष रेल्वे सोडल्या जातील याची माहिती प्रवक्त्याने दिलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार किमान १०० विशेष गाड्या सोडल्या जातील.
रेल्वेकडून सध्या देशभरात २३० विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र औद्योगिक पट्ट्यामध्ये कामगारांची मागणी वाढत आहेत. त्यामुळे अनेक गाड्यांची तिकिटे वेटिंगवर आहेत. सद्यस्थितीत सप्टेंबर महिन्यासाठीची रेल्वेची सर्व तिकिटे बूक झालेली आहेत. बिहार, बंगाल, ओदिशा, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश येथून महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि अन्न औद्योगिक क्षेत्रांकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची सप्टेंबर महिन्यासाठीची स्लीपर आणि एसी-३ ची तिकीटे बूक झालेली आहेत.
देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून देशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आलेली आहे. नंतरच्या काळात रेल्वेने काही श्रमिक ट्रेन तसेच २३० विशेष गाड्या आणि ३० राजधानी गाड्या चालवल्या आहेत.