CoronaVirus: अनलॉकच्या गर्दीने केंद्र सरकार काळजीत; संसर्गाची साखळी लसीकरणामुळेच तोडता येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 05:57 AM2021-06-20T05:57:07+5:302021-06-20T06:02:57+5:30
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे अनेक राज्यांनी प्रतिबंधक नियम शिथिल केले आहेत.
-हरीश गुप्ता
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारीक लक्ष द्या तसेच कोरोना चाचण्या व लसीकरणाचा वेग वाढवा अशी सूचना केंद्रीय गृह खात्याचे सचिव अजय भल्ला यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या एका पत्रात केली आहे.
देशाच्या अनेक भागांमध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पत्र धाडण्यात आले आहे. भल्ला यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाची साखळी लसीकरणामुळेच तोडता येईल. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे अनेक राज्यांनी प्रतिबंधक नियम शिथिल केले आहेत. मात्र ही सर्व प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक पार पाडायला हवी.
या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा पुन्हा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ नये म्हणून मास्क वापरणे, सतत हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे या उपायांचे यापुढेही नागरिकांनी पालन केले पाहिजे. तशा सूचना राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी दिल्या पाहिजेत. प्रतिबंधक नियम शिथील केलेल्या राज्यांत अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे आढळून आले आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी राज्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. कोरोना चाचण्या होण्याचे प्रमाण खाली घसरता कामा नये.
चेन्नईत चार सिंहांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट-
चेन्नईतील अरिगनर अन्ना प्राणी उद्यानातील चार सिंहांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. भोपाळच्या राष्ट्रीय प्राणी रोग संस्थेने केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली आहे. हे चारही नमुने पांगोलिन वंशाचे बी. १.६१७.२ या प्रकाराचे आहेत. जागतिक आरोग्य संघटेनेच्या निर्देशानुसार हा डेल्टा व्हेरिएंट आहे. याच महिन्यात ९ आणि १ वर्षांच्या सिंहांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोना चाचणीसाठी या उद्यानातून २४ मे रोजी ४ आणि २९ मे रोजी ७ सिंहांचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय संस्थेत पाठविण्यात आले होते. यापैकी ९ सिंहांमध्ये संसर्ग असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर या सिंहांवर उपचार सुरू आहेत.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपाययोजना हवी :
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटले आहे की, कोणत्याही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यास तिथे केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यांनी उपाय योजावेत. कोरोना चाचण्या करा, रुग्णांचा शोध घ्या, त्यांच्यावर उपचार करा, त्यांना लस द्या अशा मार्गाने हालचाली केल्यास कोरोना साथीचा नीट मुकाबला करता येईल.