मुंबई - देशामध्ये कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. देशातील अँक्टिव्ह रुग्णांचे प्रमाणही दहा लाखांच्या आत आले आहे. दरम्यान, कोरोना नियंत्रणात येऊ लागल्यापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Coronavirus in India) दिल्ली, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र तज्ज्ञांनी अनलॉकींगवरून गंभीर इशारा दिला आहे. देशातील अनलॉकींगचा वेग काही प्रमाणात कमी करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. (Unlocked in many states including Maharashtra)
एम्स मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. नवीत विग यांच्या म्हणण्यानुसार अनलॉक हळूहळू करण्याची गरज आहे. आताही हॉटस्पॉटवर लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनाविषयीच्या गाईडलाइन्सचे पालन करणे आवश्यक आहे. कारण आताही देशात सुमारे दहा लाख सक्रीय रुग्ण आहेत हे विसरून चालणार नाही.
डॉ. नवीत विग म्हणाले की, जर थोडी पँनिक परिस्थिती असली तरी हरकत नाही. कारण आताही देशात ८०-८५ हजार रुग्ण सापडत आहेत. याचा अर्थ कोरोना विषाणू अजूनही अस्तित्वात आहे. अशा परिस्थितीत कोरोना गाईडलाइन्स आणि स्वच्छ मास्कचा वापर आवश्यक आहे.
अनलॉकींगबाबत डॉ. नवीत म्हणाले की, विषाणू अजून अस्तित्वात आहे. अशा परिस्थितीत अनलॉकींगबाबत योग्य रणनीती आखणे गरजेचे आहे. जर आम्ही वेगाने अनलॉक केले तर तर ते चिंता वाढवू शकते. आपण कोरोनाचे रुग्ण आणि आरोग्य यंत्रणेच्या हिशोबाने रणनीती आखली पाहिजे.
महिनाभरापूर्वी देशात दररोज चार लाखांहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र आता हा आकडा एक लाखांच्या खाली आला आहे. राजधानी दिल्लीत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशातही ७५ जिल्ह्यात अनलॉक झाले आहे. महाराष्ट्रातही अर्धे जिल्हे अनलॉक झाले आहेत. मात्र एकूण रुग्णसंख्या पाहता अनलॉकबाबत सांभाळून पावले उचलण्याची गरज आहे.