नवी दिल्ली/ मुंबई: गेल्या २४ तासांत देशात २७,१७६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे. याच कालावधीत कोरोनामुळे २८४ जण मृत्युमुखी पडल्याने कोरोनामृत्यूंचा एकूण आकडा ४,४३,४९७ इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार, उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ पर्यंत वाढली असून ती एकूण करोनाबाधितांच्या १.०५ टक्के आहे. तर, एकूण ३,२५,२२,१७१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.६२ टक्के इतके आहे.
राज्यात दिवसभरात ३५३० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली व ५२ मृत्यू झाले. राज्यात ३६८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ४९ हजार ६९१ इतकी आहे. गेल्या २४ तासांत रायगड येथे ५९, नाशिक ७६, अहमदनगर ८७०, पुणे ३७२, पुणे शहर १८५, पिंपरी-चिंचवड १४९, सोलापूर २४४, सातारा ३०१, सांगली १७०, रत्नागिरी ६३, उस्मानाबाद ६५, बीड ६२ इतक्या रुग्णांची नोंद झाली.ठाणे जिल्ह्यात मंगळवारी १९७ करोना रुग्ण आढळून आले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीत ६१, ठाणे ५३, नवी मुंबई ४३, मीरा भाईंदर १२, अंबरनाथ १०, बदलापूर १०, उल्हासनगर ४ रुग्ण आढळून आले.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे