नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशीही १,७०० पेक्षा कमी होता. गेल्या चोवीस तासांमध्ये ६० हजार नवे रुग्ण आढळले, तर ९७ हजार जण बरे झाले. उपचार घेणाऱ्यांचे गेल्या ७४ दिवसांतील सर्वात कमी प्रमाण नोंदले गेले आहे. एकूण रुग्णांपैकी ९६.१६ टक्के लोक आता बरे झाले.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत ६० हजार ७५३ नवे रुग्ण सापडले, तर ९७ हजार ७४३ जण बरे झाले. सलग ३७ व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नव्या रुग्णांपैकी ६९ टक्के जण महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या पाच राज्यांतील आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीचे २७ कोटी २३ लाख ८८ हजार ७८३ डोस देण्यात आले आहेत. डॉक्टरांवर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन साथीच्या रोगाच्या दुरुस्ती केलेल्या कायद्यानुसार कारवाई करा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.