शीलेश शर्मा-
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा ढासळली असून, अधिकारी ऐकत नाहीत, अशी टीका सरकारमधीलच मंत्री बृजेश पाठक यांनी आहे. उत्तर प्रदेशातील ढासळलेल्या परिस्थितीचा अंदाज यावरूनच येऊ शकतो. विशेष म्हणजे यापूर्वी बृजेश पाठक यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली होती. बृजेश पाठक हे असे एकटे नेते नाहीत ज्यांनी राज्य सरकारच्या एकूणच कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ते सार्वजनिकही केले होते. यात त्यांनी आरोप केला होता की, बरेलीतील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. अधिकारी आणि डॉक्टर फोन घेत नाहीत. रुग्णांना बेड मिळत नाही, औषधी मिळत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या जवळपास एक डझनपेक्षा अधिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या भागातील अव्यवस्थेबाबत माहिती दिली आहे. भाजपच्या एका आमदारांनी तर रडत रडत आपले गाऱ्हाणे मांडले की, आपण मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांना विनंती केली. मात्र, उपचाराअभावी पत्नीने हॉस्पिटलबाहेर जीव सोडला. नोएडात बहुतांश हॉस्पिटलमध्ये लसीची कमतरता आहे. हॉस्पिटलबाहेर १८ वर्षांवरील लोकांची रांग आहे. मात्र, मुख्यमंत्री असा दावा करत आहेत की, राज्यात लसीचा, व्हेंटिलेटरचा, ऑक्सिजनचा तुटवडा नाही.
सत्ताधारी आमदार, मंत्रीच करू लागले टीका फिरोजाबादमधील भाजपचे आमदार मनीष असिजा हे सरकारी यंत्रणेमुळे इतके दु:खी आहेत की, जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्र लोकांसाठी पैसा जमवून कोरोना सेंटर स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजाबादमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये पीएम केअरमधून आलेले व्हेंटिलेटर अद्याप बॉक्समधून उघडलेही नाहीत. ते धूळखात पडून आहेत, तर दुसरीकडे रुग्ण ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडत आहेत.