लखनौ - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यानही काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने कठोर पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने लखनौसह राज्यातील 15 जिल्हे पूर्णपणे सील केले आहेत. सील करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये तबलिगी जमाती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे चाचणी अहवाल सातत्याने पॉझिटिव्ह येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार योगी सरकारने सील केलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये आग्रा, शामली, मीरत, बरेली, कानपुर, वाराणसी, लखनौ, बस्ती, गाझियाबाद, गौतमबुद्धनगर, महाराजगंज, सीतापूर, बुलदंशहर, फिरोजाबाद आणि नोएडा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून 13 एप्रिलपर्यंत पूर्ण निर्बंध लागू असतील. या काळात जनतेला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी नसेल.
उत्तर प्रदेशच मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या सर्व जिल्ह्यांतील सर्व घरांना सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरोघरी करण्यात येईल, असे उत्तर प्रदेशचे मुख सचिव राजेंद्र तिवारी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये हे 15 जिल्हे कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार 13 एप्रिल रोजी स्थितीची समीक्षा करून पुढील निर्णय घेईल.