पुणे : भारतामध्ये कोरोनावरील लसींच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत. या लसीचे डोस दिलेल्या स्वयंसेवकांमध्ये निर्माण झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीचे परीक्षण पुण्यातील इंटरअॅक्टिव रिसर्च स्कुल फॉर हेल्थ अफेअर्स (इर्षा) या संस्थेमध्ये होणार आहे. लसीच्या मानवी चाचण्या घेणाऱ्या एका संस्थेशी या परीक्षणासाठी करार करण्यात आल्याची माहिती ‘इर्षा’चे संचालक डॉ. ए. सी. मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर प्रत्येकजण लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात सिरम इन्स्टिट्युटतर्फे आॅक्सफर्ड विद्यापीठाची ‘कोव्हिशिल्ड’, भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ व झायडस कॅडिला हेल्थकेअरच्या ‘झायकोव्ह-डी’ या लसींच्या दुसºया टप्प्यातील मानवी चाचण्यांना सुरूवात झाली आहे. तसेच आणखी चार ते पाच लसींच्या पहिल्या टप्प्यातील प्राण्यांवरील चाचण्या सुरू आहेत. मानवी चाचण्यांमध्ये स्वयंसेवकांना लसीचा डोस दिल्यानंतर त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. ठराविक कालावधीनंतर त्यांच्यामध्ये कोरोना विषाणुला प्रतिकार करणारी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या रक्ताच्या विविध तपासण्या केल्या जातात. या तपासण्या करण्यासाठी एका महत्वाच्या संस्थेने भारती विद्यापीठातील ‘इर्षा’ या संस्थेशी करार केला आहे. याविषयी माहिती देताना डॉ. मिश्रा म्हणाले, ‘इर्षा’मध्ये या चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधा आहे. मानवी चाचण्यांपुर्वीच्या प्राण्यांवरील चाचण्यांची तपासणीही संस्थेमध्ये केली जात आहे. त्यासाठी काही संस्थांशी करार झाला आहे. आता लसीचा डोस दिलेल्या स्वयंसेवकांच्या रक्तामध्ये किती प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे, याची तपासणी करण्यासाठी एका मोठ्या संस्थेशी करार करण्यात आला आहे. टप्प्याटप्याने त्याच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. या तपासण्यांचे निष्कर्ष संबंधित संस्थेला दिले जाणार आहेत. संस्थेमध्ये डेंग्यु, चिकनगुनिया यावरील लसींच्या परीक्षणासाठी विविध संस्थांशी करार केले आहेत. -----------------
Coronavirus Vaccine : कोरोना लसीच्या परिणामकारकतेची तपासणी पुण्यातील ‘इर्षा’मध्ये होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 8:18 PM
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर प्रत्येकजण लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ठळक मुद्दे‘इर्षा’मध्ये या चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधा